आज महिलाही शेतात महत्त्वाच्या भूमिका बजावताना दिसत आहेत. शेतीतील रोजगारातही त्यांचा वाटा मोलाचा ठरत आहे. शेतातील महिलांचा सहभाग वाढणे खरेच सकारात्मक म्हणावे लागेल. कारण यामुळे कोणी प्रगतिशील शेतकरी म्हणून पुढे येईल, तर कोणी रोजगाराच्या नव्या संधी शोधत येईल, तर काहींना शेतीपासून नवीन रोजगार मिळेल. महिलांचा शेतीतील सहभाग वाढतोय, मात्र जगण्याचा तिचा दैनंदिन संघर्ष कमी करण्यासाठी राज्य सरकारी योजनांमध्ये प्राधान्यक्रम ठरवून त्याची अंमलबजावणी सकारात्मकरीत्या दाखवली तरच या अन्नपूर्णांचे सबलीकरण होईल.
शेतातील नांगर स्वतःच्या खांद्यावर मोठ्या कष्टपूर्वक ओढून नेणाऱ्या एका स्त्रीच्या छायाचित्राने सुमारे सात दशकांपूर्वी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. हे छायाचित्र होते, १९५७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मदर इंडिया’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीचे. पति निधनानंतर कुटुंब आणि शेतीची जबाबदारी प्रामाणिकपणे निभावणाऱ्या आदर्शवादी आणि कणखर स्त्रीच्या, या चित्रपटातील वास्तववादी चित्रणाने चित्रपटाला प्रचंड यश मिळालेच आणि ऑस्कर नामांकन मिळवणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला.
शेतीच्या कामांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने शारीरिक कष्ट उपसत आपल्या देशातील शेतकरी कुटुंबातील स्त्री, वर्षानुवर्षे हे चित्र यथार्थ ठरवत असली, तरी परंपरेने तिला दुय्यम श्रेय दिले होते. मात्र शेतीतील स्त्रीच्या श्रमांची, शेती व अन्न उत्पादनातील तिच्या योगदानाची स्वतंत्र दखल आज समाज घेऊ लागला आहे.
महिला : शेतीचा कणा
महिलांची कृषी क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. शेतीमधील नियमित,प्रासंगिक, कष्टाची,किचकट, वेळखाऊ अशी सर्वच प्रकारची कामे त्या करतात.
शेतीतील हंगामपूर्व मशागतीपासून धान्य घरात येईपर्यंत, धान्य साठवणूक, वाळवणी, शेतीपूरक पशुधनाची काळजी घेणे, त्यांचे गोठे साफ करणे, दूध काढणे, त्यांना चारा व पाणी देणे, कोंबड्या शेळ्या-मेंढ्या – पाळणे, त्यांची निगा राखणे, त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनांतून घरातील गरज भागविणे व अधिकच्या उत्पादनाची विक्री करून त्यातून चार पैसे गाठीला बांधणे, सामाजिक वनीकरण, मत्स्यपालन यांसारखी अनेकानेक कामे महिला वर्षानुवर्षे करतात.
ज्यांच्याकडे स्वतःची शेती नाही अशा कुटुंबांमधील महिला इतरांच्या शेतात मजुरी करून कुटुंबाला हातभार लावतात. महिला या अन्नधान्याच्या प्राथमिक उत्पादक आहेत, जैवविविधतेच्या संरक्षक आहेत, एकप्रकारे शेतीचा कणा आहेत.
शेतीत महिलांचा सहभाग
२०११ च्या जनगणनेनुसार भारतात २६.३१ कोटी शेतकरी असून त्यामध्ये २२.७१ कोटी पुरुष आणि ३.६० कोटी महिला आहेत. त्याचबरोबर देशात एकूण १४.४३ कोटी शेतमजूर असून त्यामध्ये ८. २७ कोटी पुरुष आणि ६.१६ कोटी महिला आहेत. २००१ ते २०११ या कालावधीत महिला शेतकऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी शेती करणारी, शेतमालाच्या व्यापारविषयीचा निर्णय घेणारी, शेतमजुरी करणारी अशा वेगवेगळ्या भूमिका पेलणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागांतून मोठ्या प्रमाणात पुरुष शहरी भागांत स्थलांतर करत असल्यामुळे घरातील महिलेकडे शेतीची जबाबदारी येत असते. काही ठिकाणी शेतकरी नवऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या आणि समाजाच्या विरोधाला तोंड देत अपुऱ्या संसाधनांच्या मदतीने आज कितीतरी एकट्या महिला शेती करत आहेत. कृषी क्षेत्र आज महिलांचे क्षेत्र होत चालले आहे. महिलांना कृषी योजनांचा लाभ प्राधान्याने देण्याचे धोरण शासनानेही अंगीकारले आहे.
शेतजमिनीची मालकी आणि महिला
‘ज्याच्या नावावर सातबारा, तो शेतकरी’, या महसुली नियमामुळे शेतीमध्ये कष्ट करूनही महिलांना शेतकरी म्हणून मान्यता आणि लाभ मिळण्यास अडचणी येत असत.
“१५ ऑक्टोबर हा दिवस ‘राष्ट्रीय महिला शेतकरी दिन‘ म्हणून साजरा करण्यात येत असून, शेतीतील महिलांचे योगदान यानिमित्त अधोरेखित करण्यात येते.”
जमिनीच्या वारसा हक्कासंदर्भात महिलांना कायदेशीर हक्क असले तरीही, सामाजिक आणि सांस्कृतिक रीतीभातींमुळे बहुतांश महिलांना जमिनीची मालकी नाकारली जात असे. हे लक्षात घेऊन, ‘शेतकरी’ म्हणून दर्जा मिळण्यासाठी शेतजमिनीवर महिलांची नावे असावीत, हा द्रष्टा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशात पहिले राज्य आहे.
१५ सप्टेंबर १९९२ला महसूल आणि वन विभागाने याबाबत परिपत्रक काढले होते. एखाद्या पुरुषाला स्वखुशीने आपल्या जमिनीच्या कागदपत्रांमध्ये पत्नीच्या नावाची नोंद सह हिस्सेदार म्हणून करायची असेल, तर त्याने विनंती केल्यास तशी नोंद फेरफार उताऱ्यात केली जाते.
जमिनीवर महिलांची मालकी असेल, तर त्या महिलांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा उत्तम राहते. जमिनीचे हक्क महिलांना कुटुंबात पत मिळवून देतात आणि त्या महिलेची समाजातील प्रतिष्ठा वाढते. जमिनीवरील स्वतःच्या मालकीमुळे स्त्रियांच्या हातात वाटाघाटी करण्याचे बळ येते.
शाश्वत विकासात योगदान
शेती सुलभपणे करण्यासाठी संसाधने, सिंचन आणि कर्ज यांचा पुरवठा, मालाची स्थानिक पातळीवर हमीभावाने खरेदी, मालाला बाजारपेठ, शाश्वत शेतीला प्रोत्साहन. संस्थात्मक सुरक्षितता, संसाधनांवर अधिकार आणि शेती व्यवस्थापनातील निर्णयप्रक्रियेमध्ये सहभाग यांसारख्या मुख्य गरजा लक्षात घेऊन, शेती व्यवसायाला आणि महिलांच्या विकासाला पूरक अशा शासकीय योजना आखल्या जात आहेत.
कष्टाने नांगर ओढणारी, आत्मविश्वासाने ट्रॅक्टर चालवणारी अशी महिला शेतकऱ्यांची आश्वासक वाटचाल कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या शाश्वत विकासातील महिलांचे योगदान अधोरेखित करणारी आहे. हे नक्की.
वरील माहितीची खात्री करणेसाठी :https://rural.nic.in/en/press-release/mahila-kisan-sashaktikaran-pariyojana
Central Government Schemes: केंद्र शासनाच्या योजन;आजच घ्या भरपूर फायदा !
FAQ:
राष्ट्रीय महिला शेतकरी दिन कधी असतो ?
15 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय महिला शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.
महिला शेतकऱ्याला काय म्हणतात ?
अशी स्त्री जी स्वत शेती किंवा शेतमजुरी करते.
सर्वात प्रसिद्ध महिला शेतकरी कोण आहे?
सर्वात प्रसिद्ध महिला शेतकरी अमांडा ओवेन – उर्फ यॉर्कशायर शेफर्डेस या आहेत.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.
3 thoughts on “Female farmers in india:सन्मान शेतीतील ‘ती’ चा”