वाढत्या उन्हाळ्यात थंडगार सरबताचा गोडवा मानवाला आल्हाददायक बनवतो. कोकणच्या निसर्गरम्य भूमीत पिकणाऱ्या रानमेव्याचा नैसर्गिक गोडवा जर सरबतातून मिळाला तर… हाच विचार घेऊन ‘द रियल टेस्ट ऑफ कोकण’ ही ओळख घेऊन फूड टेक्निशियन असणाऱ्या संगीता श्याम माळकर रा. वेतोरे ता. वेंगुर्ले यांनी ‘गोडवा’ या नावाने सरबत निर्मितीचा उद्योग केला आहे.
श्रीमती माळकर या पूर्वी ठाण्यामध्ये राहत होत्या. त्यावेळी त्या इतर उत्पादनाच्या मार्केटिंग करत होत्या. फूड टेक्नोलॉजिचा त्यांनी यामध्ये डिप्लोमाही केला आहे. त्यानंतर त्यांनी स्वतः च्या कोकणातील मूळ गावी येऊन कुडाळ एम. आय. डी. सी. मध्ये ‘वत्सला एंटरप्राईजेस’ नावाने सरबत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला.
भाऊ परेश वरवडेकर यांनी सद्य:स्थितीत या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी ‘मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत’ चालू वर्षी १ कोटी ७ लाख ५० हजार प्रकल्प खर्चाचा प्रस्ताव सादर केला. यासाठी त्यांना दोन हप्त्यांचे मिळून २० लाख ४० हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.
सध्या ‘गोडवा’ या नावाने आंबा, कोकम, अननस, फणस, जांभूळ, ऑरेंज, करवंद, कैरी, आवळा या सरबतांबरोबरच पल्प, घावण, आंबोळी, कुळीथ पिठांबरोबर फणसपोळी, फणसवडी, आंबापोळी, आंबावडी, कोकणी मसाला, सांडगी, मिर्ची, जाम अशी जवळपास ३५ प्रकारची उत्पादने तयार केली जातात.
नैसर्गिक स्वाद ग्राहकाला मिळण्यासाठी थेट स्थानिक शेतकऱ्यांकडून फळांची खरेदी केली जाते. या प्रकल्पामध्ये महिला व पुरुष अशा २० जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेत काही उत्पादनांमध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करण्यात आला आहे.
बळीराजा:शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी;योजना कामाची!
या उत्पादनाची विक्री मुंबई, गुजरात, बेंगलोर, तेलंगणा, नागपूर व स्थानिक बाजारपेठांमध्ये केली जाते. भविष्यातही या उत्पादनांची निर्यात करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील, असे श्रीमती माळकर व श्री. वरवडेकर यांनी सांगितले.
काजू प्रक्रियेतून स्वयंपूर्ण
महिला आर्थिक विकास महामंडळ, माहेर लोकसंचालित साधन केंद्र, सावंतवाडीद्वारे संचालित सातार्डा, घोगळवाडी येथील यशस्वी स्वयंसाहाय्यता महिला बचतगटाने काजू प्रक्रिया उद्योग सुरू करून महिलांची आर्थिक बाजू स्वयंपूर्ण केली आहे.
महिला बचतगट म्हटले की, आपसूकच लोणची पापड, मसाले ही उत्पादने डोळ्यासमोर येतात; परंतु याला फाटा देत यशस्वी स्वयंसाहाय्यता महिला बचतगटाने काजू प्रक्रिया उद्योग यशस्वी केला आहे.
काजू बी खरेदीपासून त्याच्या विविध प्रतवारीनुसार विक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळवत आहे. शिवाय काजूच्या राहिलेल्या तुकड्यांमधून काजू मोदक, बर्फी, लाडू, खारे काजू, मसाला काजू अशा उत्पादनांनीही बाजारपेठ मिळवली आहे. याबाबत राजश्री पारितपते यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, माविम अंतर्गत महिला बचतगट स्थापन झाला.
या बचतगटात १० महिला असून, सेंट्रल बँकेकडून २ लक्ष ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जातून सुरुवातीला २ ते ३ वर्ष आम्ही काजू प्रक्रिया व्यवसाय सुरू केला; परंतु त्यामधील मार्केटिंगची बाजू हाताळण्यासाठी सीएमआरसीचे सहकार्य आणि मार्गदर्शन घेतले.
सध्या अन्य महिला बचतगटातील शेतकरी महिलांकडून आम्ही काजू बी खरेदी करतो. बाजारभावापेक्षा एखादा रुपया जास्तीचा देत अशा काजू बीवर प्रक्रिया करून स्वयंचलित कटरवर कट करतो.
आतील काजूगर ड्रायरवर वाळवण्यात येतो. त्यानंतर त्याची प्रतवारी करण्यात येते. या प्रतवारीनुसार त्याचा दर ठरतो. असा तयार काजू आकर्षक वेष्टनामधून घाऊक तसेच किरकोळ स्वरूपात विक्री केला जातो.
ही प्रक्रिया करत असताना काही प्रमाणात काजू कणी आणि तुकड्याच्या स्वरूपात काजू तयार होतो. यापासून मोदक, बर्फी, लाडू असे पदार्थ बनवण्यात येत आहेत.
या पदार्थांनाही बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने गटाला आर्थिक उत्पन्न मिळत आहे. काजू प्रक्रिया उद्योगात काम करणाऱ्या महिलांनाही चांगला रोजगार दिला जातो.
सुरुवातीला घरातील पुरुष मंडळींकडून पैसे घ्यावे लागायचे; परंतु सद्य:स्थितीत काजू प्रक्रिया उद्योगाने आम्हा महिलांना आर्थिक उत्पन्न देऊन स्वयंपूर्ण बनवले आहे.
अधिक माहितीसाठी https://krishi.maharashtra.gov.in/Site/Information/GuideLinesInformation.aspx?ID=5
हे ही वाचा
पशुसंवर्धनातून आर्थिक विकास:पशुजन्य उत्पादनात अग्रेसर;पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा लाभ!
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.
2 thoughts on “खाद्य तंत्रज्ञ ते सरबत उत्पादक , ‘मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत’ चालू वर्षी १ कोटी ७ लाख ५० हजार प्रकल्प खर्चाचा प्रस्ताव सादर”