PMFME Scheme : लसूण सोलून देणे, पेस्ट बनवून देण्याचा उद्योग;करिअरला लसणाची फोडणी !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्वयंपाकघरात स्वादिष्ट जेवणासाठी लसणाची फोडणी ही तृप्तीची ढेकर द्यायला भाग पाडते; परंतु या लसूण पाकळ्या सोलून त्यावरील साल काढणे हे अत्यंत जिकिरीचे, कंटाळवाणे आणि वेळखाऊ काम असते.

नेमके हेच हेरून यालाच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटाच्या प्रांजली प्रमोद सुभेदार यांनी करिअर बनवले आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून लसूण सोलून देणे, पेस्ट बनवून देण्याचा उद्योग त्यांनी सुरु केला आहे.

सावंतवाडी येथे तुळजाई एंटरप्राईजेस या नावाने लसूण प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. श्रीमती सुभेदार यांच्या पुतण्याचे हॉटेल होते.

या हॉटेलसाठी त्यांना बाहेरून लसूण आणावा लागत असे आणि अगदी तोही सोलण्यासाठी पैसे द्यावे लागायचे. याच वेळी हाच उद्योग आपण सुरू केला, तर बचतगटातील महिलांनाही रोजगार मिळेल, शिवाय आपल्यालाही स्वयंरोजगार उपलब्ध होईल, ही संकल्पना त्यांच्या मनात चमकून गेली.

गुजरात, मुंबई येथून उद्योगासाठी आवश्यक असणारे लसूण गड्डे मागवून ऑक्टोबर २०२२ पासून त्यांनी हा उद्योग सुरू केला. त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री घेण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून जिल्हा सिंधुदुर्ग बँकेतून साडे सहा लाखाचे कर्ज घेतले.

यामध्ये ३५ टक्के अनुदान मिळाले. या यंत्रांच्या माध्यमातून लसूण गड्ड्याच्या पाकळ्या वेगळ्या करणे, त्याची प्रतवारी करणे, पाकळ्यांवरील साल काढणे ही कामे केली जातात.

यानंतर बचतगटातील आठ महिलांकडून पाकळ्यांची साफसफाई केली जाते. यासाठी महिलांना मजुरी दिली जाते. हा सोललेला लसूण तसेच लसणाची पेस्ट मागणीनुसार गोवा, सिंधुदुर्गमधील हॉटेलसाठी पुरवले जाते.

या व्यवसायाला खूप चांगली मागणी असून. चांगले अर्थार्जन होत आहे.

रेशीम शेतीचे गाव

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम शेती वरदान ठरत आहे. या जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील वालसा डावरगाव येथील एक नव्हे, तर सुमारे ३२ शेतकरी रेशीम शेती करून भरघोस उत्पन्न घेत आहेत.

जिल्ह्यात वालसा डावरगाव या गावाने रेशीम शेतीचे गाव म्हणून नवी ओळख निर्माण केली आहे.

या गावात शेतीबरोबरच दुग्धव्यवसायावर लोकांचा भर आहे. मूग, उडीद, मका, सोयाबीन, गहू, ज्वारी, हरभरा ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. मात्र बदलत्या हवामानामुळे भेडसावणाऱ्या नैसर्गिक आपत्तीने शेतीतून जेमतेम उत्पन्न प्राप्त होते.

या परिस्थितीवर मात करण्यासाठी गावातील काही शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळण्याचा निश्चिय केला. त्यांनी रेशीम विकास कार्यालयाला भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली.

वालसा डावरगाव येथील बबन माधवराव साबळे यांच्याकडे ३.५० एकर शेती आहे. पारंपरिक पिकातून त्यांना फारसे उत्पादन मिळत नव्हते. शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती खरोखरच वरदान आहे.

प्रारंभी आम्ही सहा शेतकऱ्यांनी मिळून एक गट तयार केला आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. रेशीम कार्यालयाकडून सखोल माहिती घेतली.

आम्हाला एकरी १ लाख ८४ हजार ३७० रुपये अकुशलसाठी व १ लाख १० हजार ७८० रुपये कुशलसाठी असे एकूण २ लाख ९५ हजार १५० रुपये इतके अनुदान एकरी ३ वर्षांसाठी मंजूर केले.

पहिल्या वर्षी केवळ दोन वेळा कोष उत्पादन घेण्यात आले. पहिल्या वेळी ३५ किलो, तर दुसऱ्या वेळी १०० किलो असे एकूण १३५ किलो कोष उत्पादन घेण्यात आले. त्यातून ६५ हजार रुपये उत्पन्न मिळाले.

दुसऱ्या वर्षी ४५० किलो कोष उत्पादनातून २ लाख २५ हजार रुपये, तर तिसऱ्या वर्षी ८०० किलो कोषातून ५ लाख ६० हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले. प्रत्येक वेळी कोष उत्पादन घेण्यासाठी साधारणतः ७ ते १० हजार रुपये इतका खर्च येतो.

  रेशीम शेतीचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वालसा वालसा डावरगावात शासनाच्या योजनेच्या माध्यमातून सुमारे ३२ शेतकरी जोमाने रेशीम शेती करत आहेत.

काजू उत्पादनात यशस्वी वाटचाल

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेंतर्गंत १ कोटी १८ लाख ४० हजार रुपये

नोकरीच्या पाठीमागे लागून आपला गाव सोडून स्थलांतरित होणाऱ्या युवकांची संख्या आता रोडावत चालली आहे. नोकरी करण्यापेक्षा आपल्या गावातच आपण व्यवसाय सुरू करून इतरांना रोजगार देऊया, या विचारातून वेंगुर्ले तालुक्यातील मोचेमाड येथील किशोर ऊर्फ विश्राम सीताराम गावडे या युवकाने शिवमाऊली अग्रोच्या माध्यमातून काजू प्रक्रिया उद्योग उभारला. विविध फ्लेव्हरचे काजू उत्पादन करत त्याने यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे.

अवघ्या एक लाखाच्या भांडवलात छोट्या प्रमाणात काजू प्रक्रिया उद्योगाची सुरुवात केली. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेंतर्गंत १ कोटी ७० लाख ४५ हजार रुपयांच्या प्रकल्प खर्चाचा प्रस्ताव विस्तारीकरणासाठी सादर केला. चालू वर्षी २० व २० लाखांचे दोन हप्ते मंजूर करण्यात आले आहेत.

ग्राहकांची चवदार मागणी आणि बदलत्या बाजाराचा कानोसा घेत विश्रामने ग्रीन चिली, रेड चिली गार्लिक, शेजवान, ब्लॅक पेपर, पाणीपुरी, टोमॅटो, रोस्टेड ड्रम, सॉल्टेड पकोडा अशा फ्लेव्हर्डचे प्रक्रिया काजू उत्पादन सुरू केले आहे. हे विविध प्रकार ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत.

गोवा, मुंबई आणि स्थानिक बाजारपेठेत याची विक्री होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. दररोज १२०० किलो काजूवर प्रक्रिया करण्यात येते.

काजूची टरफले तेल काढण्यासाठी कारखान्याला योग्य दरात दिली जातात. यासाठी लागणारा काजू थेट शेतकऱ्यांकडून व काही प्रमाणात व्यापाऱ्यांकडून खरेदी केला जातो.

असाच प्रक्रिया उद्योग कुडाळ येथील एम. आय. डी. सी. मध्ये मे. जी. एच. कॅश्यूच्या माध्यमातून गायत्री गुरुप्रसाद गोलम यांनी उभारला आहे. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेंतर्गंत १ कोटी १८ लाख ४० हजार रुपये खर्चाचा प्रकल्प सादर केला. यासाठी अनुदानाचा पहिला व दुसरा १२ लाख रुपये मंजूर करण्यात आले. दररोज ५०० किलो काजूवर प्रक्रिया करण्यात येते. या माध्यमातून ३० कामगारांना रोजगार झाला आहे. मुंबई, पुणे, उपलब्ध झाला लोणावळा, नागपूर, राजस्थान, सुरत येथील बाजारात विक्री करतात.

 PMFME Scheme या योजनेच्या खात्री साठी शासनाच्या अधिकृत पेजला भेट द्या.
शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी: शेतकरी सुखी, तर राज्य सुखी

1 thought on “ PMFME Scheme : लसूण सोलून देणे, पेस्ट बनवून देण्याचा उद्योग;करिअरला लसणाची फोडणी !”

Leave a Comment