आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ,वनराई बंधाऱ्यावर भाजीपाल्याचे मळे
कृषी स्वावलंबन योजनेमुळे जीवन सुखमयी
सातारा तालुक्यातील नांदगाव येथील युवा शेतकरी शुभम संपत गायकवाड यांना तालुका कृषी अधिकारी जे. बी. बहिरट यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची माहिती मिळाली. व त्यांनी या योजनेचा लाभ घेतला. या योजनेमुळे त्यांचे संपूर्ण जीवनमान बदलून गेले.
ग्रामपंचायत नांदगाव येथे पंचायत समिती, सातारा येथील कृषी अधिकारी यांनी अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना लाभार्थी निवड सभेमध्ये कृषी अधिकाऱ्यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये नवीन सिंचन विहीर खोदाईसाठी २ लाख ५० हजार, जुनी विहिर दुरुस्तीसाठी ५० हजार, इनवेल बोअरिंगसाठी २० हजार, पंपसंच खरेदीसाठी २१ हजार, वीज जोडणी आकार १० हजार व सूक्ष्म संचासाठी ९० टक्क्यांपर्यंत अनुदान असल्याची व कागदपत्रांची माहिती दिली.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाइन अर्ज सादर केला. या योजनेंतर्गत नवीन विहीर खोदाईचा कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर विहीर खोदाई काम सुरू केले व अवघ्या ७ फुटावर पाणी लागले ते बघून माझे कुटुंबीय आनंदी झाले. विहीर खोदाई व रिंग बांधकाम एका महिन्यात पूर्ण केले.
विहीर खोदाई व बांधकाम याचे एकूण २ लाख ५० हजार माझ्या बँक खात्यावर जमा झाले. विहिर पूर्ण झाल्यानंतर मला उर्वरित घटकामध्ये सोलार पंप ३ एचपी या घटकाचा लाभ मिळाला, असे एकत्रित मला रक्कम २ लाख ५८ हजार २८० इतके अनुदान माझ्या बँक खात्यावर जमा झाले.
सिंचन सुविधेच्या उपलब्धतेमुळे कांदा व भाजीपाला नगदी पिके घेऊ लागलो आहे. मी खूप समाधानी असून भविष्यात ऊस व आले ही पिके घेणार आहे.
माझ्या शेतीच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली असून खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या नावाप्रमाणे स्वावलंबी झालो,’ असेही ठाम विश्वासाने युवा शेतकरी शुभम गायकवाड यांनी सांगितले.
खाद्य तंत्रज्ञ ते सरबत उत्पादक , 'मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत' चालू वर्षी १ कोटी ७ लाख ५० हजार प्रकल्प खर्चाचा प्रस्ताव सादर
कृषी सिंचनाने उत्पादनात वाढ
शेतीला जलसिंचन करणे हे शेतकऱ्यांसमोरील मोठे काम असते. पारंपरिक पद्धतीने शेतीला पाणी दिल्यास इंधन, वेळ आणि पाण्याचा अपव्यय होतो.
यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत शेतीमध्ये सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचा वापर व्हावा, यासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन योजना राबवण्यात येते.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत राबवण्यात येणाऱ्या ठिबक सिंचन योजनेचा लाभ अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील चिंचरगव्हाण येथील गणेश साहेबराव गांगडे या शेतकऱ्यांनी घेतला.
श्री गांगडे यांनी सहा एकर शेतीसाठी ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला. यासाठी त्यांना २९ हजार ३०८ रुपयांचे अनुदान मिळाले. पूर्वी त्यांना संत्री, मोसंबी आणि कपाशी पीकातून अडीच लाखांपर्यंत उत्पादन व्हायचे. ठिबक सिंचनाचा लाभ घेतल्यापासून उत्पादन वाढून ते तीन लाखांपर्यंत गेले.
हा फायदा झाल्यापासून ते इतर शेतकऱ्यांनाही यासाठी प्रोत्साहित करत आहेत.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड कसबा येथील श्रीराम प्रल्हादराव होले या शेतकऱ्याने अडीच एकर शेतीसाठी ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला.
यासाठी त्यांना ५१ हजार ७२८ रुपयांचे अनुदान मिळाले. यातून त्यांनी संत्री आणि कपाशीच्या पिकासाठी ठिबक सिंचन सुरू केले. पूर्वी त्यांच्या पिकाचे मूल्य ५८ हजार ४०० रुपये होते. ठिबक सिंचनामुळे पिकाचे मूल्य १ लाख ९ हजार ५०० रुपये एवढे झाले. शिवाय ठिबक सिंचनाद्वारे कीटकनाशक औषधे झाडांना दिली. यामुळे खतांवर होणारा वेगळा खर्चही वाचला.
वनराई बंधाऱ्यावर भाजीपाल्याचे मळे
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मौजे वापे हे सुमारे ५० ते ६० आदिवासी शेतकऱ्यांचे गाव. या गावात उदरनिर्वाहाचे मुख्यतः साधन म्हणजे शेती होय. गावात दुबंडा नावाची ही छोटी नदी वाहते.
अगदीच छोट्या असलेल्या या नदीचे पाणी नोव्हेंबर – डिसेंबर अखेर ओसरते. पाणी ओसरले की या आदिवासी बांधवांना रब्बीच्या पीकावरही पाणी सोडावे लागते. त्यामुळे या नदीवर बंधारा असावा, अशी या शेतकऱ्यांची मागणी होती.
शेतकऱ्यांची ही मागणी भिवंडी तालुक्यातील कृषी विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी नोव्हेंबरमध्ये श्रमदानाने वनराई बंधारा बांधून पूर्ण केली. तालुका कृषी अधिकारी गणेश बांबळे, अंबाडीचे कृषी अधिकारी आर. डी. शिरसाट यांच्या अधिनस्थ असलेल्या सर्व क्षेत्रीय कर्मचारी, कृषी साहाय्यक व कृषी पर्यवेक्षक अंबाडी व अनगाव यांनी श्रमदानातून वापे दुंबडा नदीवर स्वतः श्रमदान करून वनराई बंधारा बांधला.
या वनराई बंधाऱ्याची लांबी सुमारे २५ मीटर असून उंची १ मीटर आहे. पाणी साठवण्यासाठीची लांबी सुमारे २०५ मीटर असून, त्यात जवळपास ४.५ ते ५ हजार घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे.
या वनराई बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना मार्च अखेरपर्यंत रब्बीचे पीक घेता आल्याने त्यांच्या हाताला काम मिळण्याबरोबरच पीकातून मिळणाऱ्या उत्पन्नाचाही आधार झाली आहे. बंधाऱ्यामुळे साचलेल्या पाणीसाठ्यावर सुमारे १५ एकर क्षेत्रावर विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे.
त्यापासून आजपर्यंत भाजीपाला लागवड करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला भाजीपाला विक्रीतून प्रती महिना सुमारे १५-२० हजार रुपये उत्पन्न मिळाल्याचे लाभार्थी आदिवासी शेतकरी बांधवांनी सांगितले.
या बंधाऱ्यांमुळे मिरची, भेंडी या भाजीपाल्याबरोबरच मोगरा फुलाला व आंबा पिकाला सुद्धा सिंचनाची सोय झाली. तसेच वन्य प्राण्यांची सुद्धा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊन नैसर्गिक समतोल राखण्यास मदत झाली आहे.
वापे गावच्या आदिवासी, अल्पभूधारक शेतकऱ्यांना रब्बी हंगामात मार्चअखेरपर्यंत शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले असून त्यामुळे रब्बी पीक त्यांच्या हातात पडून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली असल्याचे समाधान भिवंडी कृषी पर्यवेक्षक विवेक दोंदे यांनी व्यक्त केले.
पीव्हीसी पाईप / एचडीपीई पाईपसाठी ३०००० चे अनुदान;नवीन विहीर१०० टक्के अनुदान
ममता ब्राह्मणकर बनल्या आत्मनिर्भर
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील बोरकन्हार येथील ममता पवन ब्राह्मणकर स्वावलंबन लोक संचालित साधन केंद्र आमगावअंतर्गत आभा महिला बचतगट बोरकन्हारच्या सदस्या आहेत.
बचतगटाच्या व संयुक्त दायित्व गटाच्या माध्यमातून बँक कर्ज घेऊन त्यांनी दुग्धव्यवसाय सुरू केला. दुधविक्री व्यवसाय अधिक चांगल्याप्रकारे चालू लागला म्हणून त्यांनी लोकसंचालित साधन केंद्राचे मार्गदर्शन घेऊन हरिओम डेअरी तालुक्याच्या ठिकाणी उघडली. त्यानंतर त्यांना सहयोगीच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची माहिती मिळाली.
आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना कृषी विभागामार्फत संपूर्ण राज्यभर राबवली जात आहे. या योजनेंतर्गत भांडवली गुंतवणूक, सामाईक पायाभूत सुविधा, इन्क्युबेशन सेंटर, स्वयंसाहाय्यता गटाच्या सदस्यांना बीज भांडवल मार्केटिंग व ब्रॅन्डिंग इत्यादी घटकांकरिता अर्थसाहाय्य देण्यात येते.
वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के / जास्तीत जास्त १० लाख रुपये, तर सामाईक पायाभूत सुविधा / मूल्यसाखळी, इन्क्युबेशन केंद्र / मूल्यसाखळी या घटकांसाठी प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के /जास्तीत जास्त ३ कोटी रुपये अर्थसाहाय्य देय आहे.
या योजनेचा लाभ घेऊन त्यांनी दुधापासून निर्माण होणारे विविध दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याच्या मशीन विकत घेतल्या (पनीर, तूप इत्यादी). आज त्यांच्याकडे ६०० ते ८०० लिटर ८०० लिटर दूध येते.
दुधापासून त्या वेगवेगळे पदार्थ तयार करून विक्री करतात. त्यामुळे त्यांचा आर्थिक स्रोत उंचावलेला असून त्या आता आत्मनिर्भर झाल्या आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक जिल्ह्यात सगळीकडे केले जात आहे. यासाठी त्यांना कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाले
अधिक महितीसाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/SchemeData/SchemeData?str=E9DDFA703C38E51A986837A04E50D9EF ला भेट द्या .
हे ही वाचा : Female farmers in india:सन्मान शेतीतील 'ती' चा
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.
1 thought on “Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana:डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना; प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना !”