Ladki bahin yojana:राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’वरून सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. या योजनेवरून सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये तीव्र वादंग सुरु आहे. विरोधकांचा आरोप आहे की, ही योजना आगामी विधानसभा निवडणुकांना लक्षात ठेवून आणली आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जाहीर केली, आणि त्यावरून राज्यात मोठं राजकारण तापलं आहे. विरोधकांनी टीका केली आहे की, ही योजना फक्त निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आणली गेली आहे. परंतु, सरकारकडून या आरोपांना ठाम प्रत्युत्तर दिलं जात आहे. विरोधकांचं म्हणणं आहे की, ‘लाडकी बहीण’ योजना फार काळ टिकणार नाही. मात्र, अजित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
अजित पवारांचं प्रत्युत्तर
‘X’ (पूर्वीच ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अजित पवारांनी ट्विट केलं आहे की, “माझी लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष बोलत आहेत. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. विरोधकांना ही कल्याणकारी योजना बंद पाडायची आहे कारण त्यांना वाटतं ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे. पण मी या योजनेला अधिक बळकटी देऊन योजनेची रक्कम वाढवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आहे,” असं अजित पवारांनी ठणकावलं आहे.
‘माझी लाडकी बहीण योजना’ अर्जासाठी मुदतवाढ
राज्य सरकारने योजना जाहीर केल्यानंतर अर्ज भरण्यासाठी 31 जुलैची अंतिम तारीख देण्यात आली होती. मात्र, आता ही मुदत वाढवून 31 ऑगस्टपर्यंत केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, योजनेला मिळालेल्या वाढत्या प्रतिसादामुळे आणि अर्ज भरण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की, 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल केलेल्या महिलांना जुलै महिन्यापासून लाभ मिळेल. त्यामुळे आता महिलांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.
अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रं
- आधारकार्ड
- रेशनकार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो
- अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र
- लग्नाचे प्रमाणपत्र
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.